(पुणे)
पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात चर्चेत असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. खंडणी, अपहरण, मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सचिन घायवळला राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात सचिन घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, मागील काही दिवसांपासून तो फरार होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा माग काढत राजस्थानमध्ये सापळा रचला आणि बुधवारी (दि. ३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. 9 महिने फरार असलेल्या सचिन घायवळच्या विरोधात 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई सुरु केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याला अटक केल्यानंतर पुण्यातील अनेक गँगचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेपासून बचाव करण्यासाठी सचिन घायवळने पूर्णपणे वेषांतर केले होते. त्याने दाढी आणि केस वाढवून स्वतःची ओळख लपवली होती. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून सीकर येथे तो कोणाच्याही संपर्कात न राहता एकटाच राहत होता.
दरम्यान, पुणे पोलिसांना स्थानिक खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, संबंधित परिसरात महाराष्ट्रातील एक व्यक्ती राहत आहे. या माहितीची खात्री करून पुणे पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत सचिन घायवळला अटक केली. विशेष म्हणजे, या पथकातील काही पोलिसांनी सचिन घायवळला यापूर्वी पाहिले असल्याने वेषांतर असूनही त्याची अचूक ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
सचिनचा भाऊ आणि घायवळ टोळीचा मुख्य म्होरक्या निलेश घायवळ हा सध्या देशाबाहेर फरार असल्याची माहिती समोर आली आहे. फरार काळात सचिन घायवळ हा निलेशच्या संपर्कात होता का? तसेच परदेशातून टोळीचे नेटवर्क चालवले जात होते का? याचा तपास आता पुणे पोलीस करणार आहेत.

