(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील मारळ फाटा ते कळकदरा मार्गालगतच्या झाडाझुडपांत एका प्रौढाचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम अणेराव (वय ५२) अशी पटली असून, घटनेमुळे स्थानिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारळ फाटा परिसरातून उग्र दुर्गंधी येत असल्याची माहिती गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मारळ येथील पोलिस पाटील देवदास चंद्रकांत सावंत यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, रस्त्याच्या उजव्या बाजूच्या गवताळ भागात एका पुरुषाचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत पडलेला दिसून आला.
मृतदेह मोठ्या प्रमाणावर कुजलेला असल्याने सुरुवातीला ओळख पटविण्यात अडचणी निर्माण झाल्या. मृत व्यक्तीच्या अंगावर राखाडी रंगाची पँट, काळपट रंगाचा टी-शर्ट, डोक्यावर लाल रंगाची टोपी आढळली; तसेच जवळच एक टॉवेलही सापडला. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व तपासाची सूत्रे हाती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर मृत व्यक्तीची ओळख संतोष राजाराम अणेराव अशी निश्चित करण्यात आली.
प्राथमिक अंदाजानुसार ही घटना १९ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील कारणांबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दुर्गम भागात अशा अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिस सर्व अंगांनी तपास करत आहेत.

