(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील उगवता कोंडवाडी परिसरातील काजू बागांमध्ये भीषण वनवा लागल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना ४ जून रोजी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.
या वनव्यात प्रकाश गवळी, महेश धनावडे, चंद्रकांत घडशी, सुरेश धनावडे आणि संतोष धनावडे या शेतकऱ्यांच्या सुमारे १५ वर्षांपासून जोपासलेल्या काजू बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या झाडांना आगीने अक्षरशः भस्मसात केले असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या भागातील जंगल साफ करून गेल्या पंधरा वर्षांत या शेतकऱ्यांनी कष्टाने काजू बागा विकसित केल्या होत्या. मात्र अचानक लागलेल्या वनव्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. ही आग नेमकी कशी लागली किंवा कोणी लावली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
वनव्यामुळे हातातोंडाशी आलेले उत्पन्न नष्ट झाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

