( संगमेश्वर /रत्नागिरी प्रतिनिधी )
स्त्री म्हणजे आदिमाया, आदिशक्ती… हे शब्द प्रत्यक्षात उतरवणारे उदाहरण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील तेरे बुरंबी येथील रहिवासी सौ. शितल मोहन चव्हाण. पतीच्या निधनानंतर पाच मुलींच्या संगोपनाचे जड ओझे पेलत त्यांनी केवळ कुटुंब उभे केले नाही, तर आपल्या जिद्दीच्या जोरावर हॉटेल व्यवसायही नव्या उमेदीने पुढे नेला.
राजापूर तालुक्यातील कोंडे तड हे शितलताईंचे माहेर. पती कै. मोहन चव्हाण यांनी वडापावच्या हातगाडीतून व्यवसाय सुरू करून पुढे संगमेश्वर बाजारपेठेतील ‘सुर्वे कॉम्प्लेक्स’मध्ये श्री स्वामी समर्थ हॉटेल सुरू केले. मनमिळाऊ स्वभाव आणि दर्जेदार खाद्यपदार्थांमुळे हा व्यवसाय भरभराटीस आला. परंतु, २१ नोव्हेंबर २०१८ रोजी पतीचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला.
पतीच्या निधनाने पाच मुलींचे भवितव्य धोक्यात आले असताना, माहेरच्या आधाराने व पालकांच्या प्रेरणेने शितलताईंनी धैर्य एकवटले. व्यवसाय पुन्हा सुरू करत मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. आज मोठी कन्या मानसी बी.एस्सी. नर्सिंग शिकत आहे, तर दुसरी कन्या मनाली बी.एस्सी. आयटीचे शिक्षण घेत आहे. मधुरा बी.ए., श्रावणी नववीत शिकत असून कबड्डीसह विविध खेळांत प्राविण्य मिळवत आहे. धाकटी सृष्टी प्राथमिक शिक्षण घेत आहे.
पहाटे चार वाजता उठून संसाराची चाकं फिरवणाऱ्या शितल चव्हाण या कर्तव्यदक्ष मातृत्वाचे उत्तम उदाहरण ठरल्या आहेत. पतीची साथ नसल्यानंतरही आईवडिलांचा आधार आणि नातेवाईकांचा हात नेहमी मिळाला, हीच खरी ताकद ठरली, असे त्या सांगतात.
कै. मोहन चव्हाण यांनी सुरू केलेल्या हॉटेल व्यवसायाला आज २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे सूत्रधारपद शितल चव्हाण यांच्याकडे असून, आपल्या जिद्द, परिश्रम आणि धैर्यामुळे त्या तालुक्यातील सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

