( देवरुख / प्रतिनिधी )
संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा समितीने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय देवरुख येथे वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन केशव जोशी यांच्या शुभहस्ते, नुकतेच करण्यात आले. या प्रकाशन समारंभात संस्कार भारतीचे महामंत्री मंगेश बापट यांनी ही दिनदर्शिका तयार करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. संस्कार भारती ही ललित कलांच्या क्षेत्रात राष्ट्रीय चेतना निर्माण करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय स्तरावर कार्य करणारी संस्था आहे.
“सा विद्या या विमुक्तये” हे संस्कार भारतीचे ब्रीदवाक्य आहे. संगीत नाटक, नृत्य, चित्रकला, साहित्य, शिल्प, लोककला आणि भूअलंकरण (रांगोळी) अशा कलांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि संस्कार यांची जागृती करणे, कलांचे प्रशिक्षण देणे, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे, तसेच सांस्कृतिक प्रदूषणाला आळा घालणे ही संस्कार भारतीची प्रमुख ध्येय असल्याची माहिती महामंत्री मंगेश बापट यांनी यावेळी दिली. या दिनदर्शिकेत कोकणातील लोककलांची विस्तृत माहिती देण्यात आली आहे . यामध्ये गोफ नृत्य, टिपरी नृत्य, दशावतार, नकटा डेरा, संकासुर, काटखेळ, नमन, जाखडी, पालखी नृत्य, गौरी गणपतीचा नाच, चित्रकथी, सापाड इ. कलांविषयीची सविस्तर माहितीचा समावेश दिनदर्शिके आहे. जे ही दिनदर्शिका घेऊ इच्छितात, त्यांनी मोबाईल क्र. ९४२२००३४२२ या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांन केले आहे
फोटो: दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना अध्यक्ष प्रा. जोशी आणि इतर मान्यवर.

