( नवी दिल्ली )
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता गैरवापर रोखण्यासाठी जागतिक पातळीवर एकसंध समझोता आवश्यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. डीपफेक, दहशतवाद आणि सायबर धोक्यांमध्ये एआयचा वापर वाढत असल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तंत्रज्ञान हे अर्थकेंद्रीत नव्हे तर मानवी केंद्रीत असावे, आणि त्याचा गैरवापर कुठेही होत असेल तर तो तत्काळ थांबवला पाहिजे, असे ते म्हणाले.
जी-२० शिखर संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, डीपफेक आणि दहशतवादी कारवायांमध्ये एआयचा वापर चिंताजनक आहे. अशा गैरवापरावर जागतिक बंदी आणि स्पष्ट धोरणे आवश्यक आहेत. तंत्रज्ञानाचा विकास एकाच मॉडेलवर आधारित न होता, प्रत्येक राष्ट्राच्या क्षमता आणि आवश्यकता ओळखून व्हायला हवा. भारताने याच दृष्टीकोनातून तंत्रज्ञान इकोसिस्टम उभारली असून अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल व्यवहार या सर्व क्षेत्रांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
नोकऱ्यांऐवजी नव्या कौशल्यांवर भर देण्याची वेळ
एआयच्या युगात नोकऱ्यांचे स्वरूप वेगाने बदलत असल्याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “आजच्या नोकऱ्यांपासून उद्याच्या कौशल्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नवोन्मेषासाठी प्रतिभेला गती देणे गरजेचे आहे. आम्ही हा मुद्दा दिल्ली जी-२० बैठकित मांडला होता. आगामी काळात जी-२० देश प्रतिभाविकासासाठी जागतिक प्रणाली उभारतील, याचा मला विश्वास आहे.”
भारतात २०२६ मध्ये एआय शिखर परिषदेचे आयोजन
एआय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन’ आयोजित करणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या संकल्पनेवर आधारित हा समिट होणार असून भारत त्याचे यजमानपद भूषवेल. यामध्ये जी-२० सदस्य राष्ट्रांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

