(चिपळूण)
तालुक्यातील सती परिसरात ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. स्वप्निल बुद्धघोष कवडे (वय ३८, रा. सती, शिवसमर्थ पॅलेस, रूम क्र. १८) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निलचे वडील बुद्धघोष शंकर कवडे हे शनिवारी सायंकाळी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्यांची मुलगी श्रद्धा हिने फोन करून स्वप्निलने बेडरुममध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच त्यांनी तातडीने घरी धाव घेतली.
घरात पाहणी केली असता, स्वप्निलने बेडरुममधील सीलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.
स्वप्निलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सती परिसरात शोककळा पसरली आहे.

