( चिपळूण / वार्ताहर )
चिपळूण शहराजवळील कळंबस्ते गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक रोखली. या कारवाईत ४० बॉक्स दारूची वाहतूक करणारी टोयोटा इनोव्हा गाडी पकडण्यात आली. दारू आणि वाहनासह एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गाडीचा मालक फरार झाला आहे.
महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असलेली विदेशी दारू चिपळूणमार्गे वाहून नेण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागाच्या पथकाने कळंबस्ते परिसरात सापळा रचून संबंधित वाहनावर कारवाई केली.
तपासणीदरम्यान टोयोटा कंपनीची इनोव्हा (क्रमांक MH-04-EH-4656) आढळून आली. या वाहनातून गोवा निर्मित विदेशी दारूचे ४० बॉक्स, म्हणजेच ३४५.६० बल्क लिटर दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या दारूची किंमत ४ लाख ८० हजार रुपये, तर इनोव्हा गाडीची किंमत ३ लाख रुपये आहे.
वाहनाच्या आरटीओ नोंदणीवरून त्याचा मालक संकेत पि. पांडुरंग राठोड (वय ३२, रा. चव्हाणवाडी, पो. हनेगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, कारवाईदरम्यान तो फरार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५ (अ), (ई), ९० नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनिल आरडेकर, दुय्यम निरीक्षक संजय मालुसरे, जवान वैभव सोनावले, शुभम काडापुरे, मयूर पुरीबुवा आणि जवान-नि-वाहनचालक विशाल विचारे यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सुनिल आरडेकर करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात परराज्यातील अवैध दारूची वाहतूक किंवा साठा, हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री तसेच बनावट माडीची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हाट्सअप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


