(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल बाजारपेठ ही राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जाते. दररोज सुमारे 40 ते 45 गावांतील नागरिक या बाजारपेठेत खरेदी, व्यवहार आणि इतर दैनंदिन कामांसाठी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायाला या बाजारपेठेचा मोठा आधार आहे. मात्र, सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे पाचलमधील हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा अनियमित झाल्याने अनेक हॉटेल चालक अडचणीत सापडले आहेत. परिणामी, अनेक हॉटेल्सनी सकाळचा नाश्ता बंद केला असून काही ठिकाणी केवळ मर्यादित आणि परवडणारे पदार्थच ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम ग्राहकांवरही होत असून, रोजंदारी करणारे, प्रवासी आणि बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाश्ता-जेवणासाठी पर्याय कमी पडत आहेत.
विशेष म्हणजे, परिस्थितीशी दोन हात करत अनेक हॉटेल चालकांनी हॉटेलच्या मागील बाजूस पारंपरिक चुलीचा वापर सुरू केला आहे. लाकूड किंवा इतर इंधनाच्या साहाय्याने नाश्ता व जेवण बनवून ग्राहकांची सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या पद्धतीत वेळ अधिक लागत असून खर्चही वाढत असल्याने व्यावसायिकांचे गणित बिघडले आहे.
पाचल बाजारपेठेतील हॉटेल प्रभा किचन, हॉटेल न्यू प्रकाश, हॉटेल मुंबई, हॉटेल सफा, हॉटेल वैभव आणि हॉटेल सद्गुरू यांसारख्या मोठ्या हॉटेल्सनाही या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. नियमित ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी हे हॉटेल चालक विविध पर्यायांचा अवलंब करत असले तरी परिस्थिती आव्हानात्मकच आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या मते, गॅस टंचाईमुळे केवळ व्यवसायावरच नाही तर कामगारांवरही परिणाम होत आहे. काही ठिकाणी कामाचे तास कमी करावे लागत असून उत्पन्नात घट झाली आहे. ग्राहकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांकडून होत आहे. पाचलसारख्या गजबजलेल्या बाजारपेठेत अशा मूलभूत सुविधांची कमतरता राहू नये, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

