(दापोली)
दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून चोरट्यांनी तब्बल 13 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणात फिर्यादीने परिसरातील व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गव्हे पवारवाडी येथील रहिवासी अशोक गोविंद पवार (वय 51) हे कुटुंबासह गावातील भैरी देवी यात्रेनिमित्त घराबाहेर गेले होते. 10 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या सिमेंटच्या दरवाजाला कोयता, पक्कड आणि चाकूच्या साहाय्याने छिद्र पाडून आत प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला. यामध्ये 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे 11 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ज्यात गंठण, हार आणि चपली हार यांचा समावेश आहे असा एकूण 13 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या घटनेनंतर अशोक पवार यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीने आपल्या शेजाऱ्यावर संशय व्यक्त केल्याने तपासाला वेग आला आहे.

