(श्रीवर्धन जि. रायगड)
सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याच्या प्रलंबित कामासाठी १५,००० रुपयांची लाच मागणाऱ्या महसूल सहायकाला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. विकास मनोहर बोंडले (वय ३४), महसूल सहायक, तहसील कार्यालय श्रीवर्धन, यांनी ही लाच एका २९ वर्षीय तक्रारदाराकडे मागितल्याचे उघड झाले आहे. तक्रारदाराने याबाबत २४ जून २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार २६ जून रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान बोंडले यांनी तक्रारदाराकडे प्रत्यक्षपणे १५,००० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईसाठी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कार्यवाही केली. पंचासमक्ष ही पडताळणी करण्यात आली. महसूल सहायक बोंडले यांच्याविरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार पवार, गिरासे, नाईक आणि चालक हवालदार गायकवाड यांचा समावेश होता.
नागरिकांना आवाहन :
रायगड, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा खाजगी एजंट लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उप अधीक्षक धर्मराज सोनके यांनी केले आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – 022 2542 7979 तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

