(मुंबई)
भारतीय पर्यटनाला नवी दिशा देणारा मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल (MICt) नुकताच सुरु झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या या क्रूझ टर्मिनलवर एकाच वेळी पाच क्रूझ जहाजे पार्क होऊ शकतात. या टर्मिनलद्वारे प्रवाशांना सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, मालदीव, श्रीलंका, लक्षद्वीप, कोची आणि गोवा अशा नऊ पर्यटन स्थळांची सफर करता येईल.
या टर्मिनलची रचना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह करण्यात आली असून, प्रवाशांना एकाच ठिकाणी चेक-इन, इमिग्रेशन, हॉटेल, भोजन, मनोरंजन, वाहतूक अशा सर्व सुविधा उपलब्ध होतील. टर्मिनलचे पहिले दोन मजले 2,07,000 चौ.फूट क्षेत्रात पसरलेले आहेत. येथे 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत, तर दरवर्षी अंदाजे 10 लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता आहे.
क्रूझमध्ये लक्झरी अनुभव
प्रवासात प्रवाशांना थिएटर शो, डिस्को, कॅसिनो, स्विमिंग पूल, स्पा, योगा, जिम यासारख्या सुविधा उपलब्ध असतील. तसेच सनसेट डिनर, डान्स परफॉर्मन्स, लाईव्ह म्युझिक यामुळे प्रवास कंटाळवाणा वाटणार नाही. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, डॉल्फिन स्पॉटिंगसारखे साहसी अनुभवही प्रवाशांना मिळणार आहेत. एकाच ठिकाणी राहून अनेक गंतव्यांचा अनुभव घेता येईल, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो.
तांत्रिक वैशिष्ट्ये
- टर्मिनलचे एकूण क्षेत्र 4,15,000 चौ.फूट
- लांबी 11 ते 300 मीटरपर्यंतच्या क्रूझेसला पार्क करण्याची क्षमता
- 300 हून अधिक वाहनांचे पार्किंग
- 22 लिफ्ट्स आणि 10 एस्केलेटर
- समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी लहरी छताची रचना
- सुरक्षा मानके, डॉक्टर्स, हेल्थ सेंटरसह आंतरराष्ट्रीय सुविधा
पर्यटनाला चालना
सरकारच्या क्रूझ इंडिया मिशन अंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प भारतातील क्रूझ पर्यटनाला मोठी चालना देईल. मुंबईला ‘क्रूझ हब’ बनवण्याचे उद्दिष्ट असून, या टर्मिनलमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढेल. मुंबईचा ऐतिहासिक समुद्री वारसा आणि पर्यटन एकत्र येऊन आता देशाच्या पर्यटनाला नवा आयाम मिळणार आहे.

