(दापोली)
दापोली तालुक्यातील मुगीज गोमलेवाडी येथे १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आर्यन प्रकाश गोमले (वय १७ वर्षे ३ महिने) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन हा इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत होता. त्याची ९ एप्रिल २०२६ रोजी तोंडी परीक्षा सुरू होणार होती. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्याची आई प्रतिभा गोमले या कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. याच दरम्यान घरात कोणी नसताना आर्यनने बेडरूममधील लाकडी वाशाला नायलॉनच्या साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.
सकाळी सुमारे ११:३० वाजता ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला खाली उतरवून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, मोबाईलचा अतिवापर आणि परीक्षेचा ताण यामुळे आर्यन मानसिक तणावात होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे गोमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वाढता अभ्यासाचा ताण आणि मोबाईलचे व्यसन याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

