(दापोली)
विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांचे कट्टर विरोधक म्हणून ज्यांनी निवडणूक लढवली ते संजय कदम हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. माहितीनुसार, माजी आमदार संजय कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १३ मार्च रोजी सकाळी शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
दापोली मतदार संघातील संजय कदम हे रामदास कदम यांचे कट्टर विरोधक मानले जातात. पण तेच आता मित्र होणार आहेत. तर कट्टर राजकीय शत्रू आता पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष सोडल्यानंतर संजय कदम यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर दापोली मतदार संघातून शिवसेनेचे तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला होता. कालांतराने रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे या मतदार संघात सक्रीय झाले व त्यांनी पहिल्याच निवडणुकीत संजय कदम यांना पराभूत करत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा दापोली मतदार संघावर फडकावला. शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट झाल्यानंतर योगेश कदम हे शिंदेंच्या सोबत राहिले. तर राष्ट्रवादी सोडून संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा शिवबंधन बांधून घेतले.
दापोली मतदार संघातील उद्धव ठाकरेंचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या वर्षभरात शिंदे गटात गेले आहेत. नुकताच दापोली नगर पंचायती मधील नगरसेवकांच्या एका गटाने रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात असतानाच दापोली -खेड- मंडणगड मतदारसंघातील प्रमुख विरोधी पक्षनेते संजय कदम यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या बातमीनंतर दापोली- खेड -मंडणगड मतदार संघातून आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा माजी मंत्री रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भक्कम केल्याची बाब समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी दापोली मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांची मंडणगड येथील रामदास कदम यांच्या फार्म हाऊसवरही माजी आमदार संजय कदम यांनी भेट घेतल्याचीही चर्चा आहे. तर रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन झाल्याची चर्चाही मतदारसंघात आहे. त्यामुळे दापोली मतदारसंघातून पुन्हा एकदा विरोधी पक्ष हा नेस्तनाबूत होत असताना आणि तालुक्यावर शिवसेनेची भक्कम पकड पुन्हा एकदा घट्ट होत असल्याचे चित्र आहे. संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशाला दोन्ही शिवसेनेकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. शिवसेना प्रवेश निश्चित झाल्याच्या वृत्तालाही संजय कदम यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र कार्यकर्त्यांमध्ये धनुष्यबाण हाती घेण्याची लगबग सुरू असल्याचे सध्या चित्र आहे.