(दापोली)
दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथे ७० वर्षीय वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मृत महिलेचे नाव लक्ष्मी सहदेव भानत (वय ७०, रा. सोवेली चव्हाणवाडी) असे आहे. त्या काही काळापासून सांधेदुखीच्या त्रासाने ग्रस्त होत्या. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजता त्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता, घराजवळील विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीत त्या पाण्यावर उताण्या अवस्थेत तरंगताना आढळून आल्या. त्यानंतर त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, आजाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे किंवा पाय घसरून त्या विहिरीत पडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी त्यांचे पुतणे रविकांत गोविंद भानत यांनी दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्र. ३८/२०२६) केली असून, पुढील तपास सुरू आहे.

