(दापोली /रत्नागिरी)
मद्यधुंद अवस्थेत भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालविण्याचा प्रकार दापोली तालुक्यातील कुंभवे शिगवणवाडी येथे घडला. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने आपल्या ताब्यातील स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश सखाराम पवार (वय ६०) आणि वसंत सखाराम कोळंबे (वय ५०, दोघेही रा. कुंभवे शिगवणवाडी, ता. दापोली) हे गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास कुंभवे शिगवणवाडी येथील खेड-दापोली मुख्य मार्गावर घडला. आनंद अशोक पांचाळ (वय २१, रा. महावीर चौक, ढवळे कॉर्नर, सिडको, कोठा, नांदेड) हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (क्रमांक एमएच १४ केए ७९६२) घेऊन जात होता. त्याने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने आणि हयगयीने वाहन चालविले. यावेळी रस्त्याच्या बाजूने पायी जाणाऱ्या सुरेश पवार आणि वसंत कोळंबे यांना कारची जोरदार धडक बसली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देणे अपेक्षित असताना चालकाने अपघाताची माहिती न देता तसेच जखमींना उपचारासाठी दाखल न करता घटनास्थळावरून दापोलीच्या दिशेने पलायन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र तुकाराम नलवडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद पांचाळ याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १८५, १३४ (अ) आणि १३४ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, दापोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.


