(देवरुख)
आंबा घाटातील अतिदुर्गम दख्खन धनगरवाडी पूर्व येथे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या एका तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवले आहे. मंगेश सोमा फोंडे असे या जिद्दी तरुणाचे नाव असून, त्याने एनटीसी (NTC) मधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विशेष म्हणजे, मंगेश ज्या वस्तीमध्ये वाढला, त्या ठिकाणी आजही वीजसुविधा उपलब्ध नाही. त्याचे आई-वडील शेतीसोबत पशुपालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दुधाच्या उत्पन्नावर घर चालवताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. लहानपणापासूनच मंगेशने कुटुंबाला हातभार लावला. आंबा घाट परिसरातील जंगलातून करवंदे आणि जांभूळ गोळा करून तो रस्त्याच्या कडेला विकत असे. तसेच कुड्याच्या पानांमध्ये भरून ही फळे विकण्याचे काम तो नियमित करत होता. याशिवाय, आंबा घाटातील छोट्याशा टपरीवर आंबे, फणस आणि कणसे भाजून विकण्याचे कामही त्याने केले.
शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्याने चौथीपर्यंत शिक्षण दख्खन शाळेत घेतले. त्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंत साखरपा येथील वसतिगृहात राहून महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण पूर्ण केले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही न खचता, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मंगेशने आपले ध्येय गाठले. त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मंगेश फोंडेची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

