(दापोली)
देशातील उत्कृष्ट पीएम श्री शाळा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून दापोली तालुक्यातील वाकवली नं.1 शाळेची केंद्र शासनाने निवड केली आहे. यामुळे सर्वत्र शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत असून, या शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल रत्नागिरी जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आज जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सन्मानपत्र देऊन शाळेचा गौरव केला. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक जावेद शेख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्गेश जाधव व उपाध्यक्ष समीर कुरेशी यांनी हा सन्मान स्विकारला.
वाकवली नं.1 शाळेने मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार असून परिसरातील सर्व शाळांनी या शाळेचा आदर्श घेऊन कार्य करावे व या शाळेत राबवले गेलेले उपक्रम स्वतःच्या शाळेत राबवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे, असे मत यांनी रानडे व्यक्त करीत लवकरच सदर शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधणार असल्याचेही सांगितले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री गावंड, पीएम श्री योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी श्री कांबळे, श्रीमती परविन जागीरदार व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.