(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, कळझोंडी नं. १ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन उद्या, शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. हा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, नामवंत उद्योगपती रविंद्र सामंत यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्या उषा सावंत, पंचायत समिती सदस्या अनुष्का खेडेकर, सरपंच दिप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय गटविकास अधिकारी चेतन शेळके, गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल, माजी सभापती मेघना पाष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार तसेच कळझोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख जयदीप यादव आदी अधिकारी व मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभासाठी कळझोंडी गावातील ग्रामस्थ तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार जाधव आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

