(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोंडये गावच्या माजी सरपंच सौ. पूनम देसाई यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाडीच्या आणि आक्रमक कार्यपद्धतीचा प्रत्यय देत जनहितासाठी पुढाकार घेतला आहे. कडवई येथील एचपी गॅस एजन्सीकडील १३ महिला ग्राहकांचे कनेक्शन देवरुख येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीकडे वर्ग करण्याची कायदेशीर मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने देसाई यांनी थेट तहसील कार्यालय गाठत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार मांडली. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला असून, या प्रकरणाची चर्चा जिल्हास्तरावर सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महालक्ष्मी गॅस एजन्सीकडून ग्राहकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पूनम देसाई यांनी स्वतः पुढाकार घेत १३ महिला ग्राहकांना सोबत घेऊन तहसील कार्यालयात धडक दिली. केवळ निवेदन देऊन न थांबता त्यांनी तिथूनच एचपी गॅस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राम यादव यांच्याशी थेट संपर्क साधला आणि एजन्सीच्या कारभाराची सविस्तर माहिती दिली. देसाई यांच्या ठाम आणि रोखठोक भूमिकेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक भूमिका घेत ग्राहकांचे कनेक्शन वर्ग करण्याबाबत आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले.
महालक्ष्मी गॅस एजन्सीच्या कार्यपद्धतीवर ग्राहकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. तक्रार नोंदवण्यासाठी किंवा चौकशीसाठी फोन केल्यास तो उचलला जात नाही. कधी उचललाच, तर समाधानकारक उत्तर दिले जात नाही, अशी तक्रार अनेकांनी व्यक्त केली. याशिवाय, गॅस बुकिंग व वितरणाचे मेसेज मोबाईलवर येत असतानाही प्रत्यक्षात सिलेंडर मिळत नसल्याचे ग्राहक सांगतात. अनेक वेळा वितरणाची गाडी गावात येऊनही काहींना गॅस न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. “मेसेज येतो, गाडीही येते; मग सिलेंडर जातात कुठे?” असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचा संशय व्यक्त होत असून चौकशीची मागणी जोर धरत आहे.
कारभार सुधारा, अन्यथा कुलूप ठोकू – देसाईंचा इशारा
एजन्सीच्या मनमानी कारभारावर टीका करताना पूनम देसाई यांनी कठोर इशारा दिला. “ग्राहकांना वेळेवर गॅस मिळाला नाही आणि व्यवस्थापनाच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, तर महिलांसह एजन्सीवर धडक देऊन कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा निर्णय घ्यावा लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या इशाऱ्यामुळे एजन्सी व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.
ही समस्या केवळ कोंडये गावापुरती मर्यादित नसून खाडीभागातील अनेक गावांतील ग्राहकही याच समस्येला सामोरे जात आहेत. इतर तालुक्यांतील गॅस एजन्सी सुरळीत सेवा देत असताना देवरुख येथील महालक्ष्मी एजन्सीच का अपयशी ठरते, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.
कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यासाठी विविध कारणे पुढे केली जात असली, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत दोन-दोन महिने गॅस गाडीच येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामुळे एजन्सीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकशक्तीचा इशारा; ‘भारत गॅस’कडे वळण्याची तयारी
पूनम देसाई यांच्या या भूमिकेला परिसरातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता, ठोस कृतीची मागणी आता जोर धरत आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास महालक्ष्मी गॅस एजन्सीशी संबंध तोडून ‘भारत गॅस’कडे वळण्याचा निर्णय लोकशक्तीच्या जोरावर घेतला जाईल, असा इशाराही देसाई यांनी दिला.
इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी गाडी; पण ‘दिखावा’ असल्याचा आरोप
तहसील कार्यालयात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत महालक्ष्मी गॅस एजन्सीची गाडी कोंडये गावात दाखल झाली. मात्र, या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना देसाई यांनी ही तत्परता केवळ दिखावा असल्याचा आरोप केला. “कारवाईच्या भीतीने दुसऱ्याच दिवशी गाडी पाठवून लोकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा तात्पुरत्या उपायांनी आमचे समाधान होणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणामुळे महालक्ष्मी गॅस एजन्सीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आता याकडे कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

