(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील लाजुळ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींसाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. हा उपक्रम जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन अंतर्गत कार्यरत 2D जायंट ग्रुप ऑफ रत्नागिरी यांच्या माध्यमातून राबवण्यात आला.
ग्रामीण भागातील शाळांनाही शहरातील शाळांप्रमाणे आवश्यक भौतिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने फेडरेशन सामाजिक बांधिलकीतून सातत्याने कार्यरत आहे. शाळेची गरज लक्षात घेऊन मुलींसाठी सुरक्षित व स्वच्छ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्य व उपस्थितीला मोठा फायदा होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी फेडरेशनचे सेवाभावी अध्यक्ष गजानन गिडये यांच्यासह महेश दामले, पराग गोडबोले, भूषण मुळ्ये, प्रवीण डोंगरे, संजय पाटणकर, मिलिंद सावंत, सुवर्णा पवार, मेघना परांजपे, चंद्रमोहन देसाई, श्री. बन्सी आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक महेंद्र कुळेकर यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व संस्थेच्या वतीने जायंट्स ग्रुपचे आभार मानण्यात आले. हा उपक्रम ग्रामीण शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असून, सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे शाळांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

