(रत्नागिरी)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्हास्तरीय ‘विशेष कक्ष’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हा विशेष कक्ष तात्काळ प्रभावाने कार्यान्वित करण्यात आला असून, जिल्ह्यातील कचरा व्यवस्थापन प्रक्रियेवर आता अधिक काटेकोर देखरेख ठेवली जाणार आहे.
या विशेष कक्षाच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यावर नियमित नियंत्रण ठेवले जाणार असून, अनधिकृत डम्पिंग, उघड्यावर कचरा टाकणे किंवा कचरा जाळणे यांसारख्या पर्यावरणास घातक प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
स्थापन करण्यात आलेल्या या विशेष कक्षाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), पोलीस अधीक्षक तसेच संबंधित विभागांचे प्रमुख सदस्य म्हणून कार्यरत राहतील. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी स्पष्ट केले की, हा विशेष कक्ष केवळ प्रशासकीय पातळीवर मर्यादित राहणार नसून प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करणार आहे. जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.
विशेष कक्षाची प्रमुख कार्ये
- अधिकृत आणि अनधिकृत डम्पिंग साईट्सची ओळख पटवून त्यांचे ‘जिओ टॅगिंग’ करणे.
- तपासणी अहवाल छायाचित्रांसह सादर करून नियमित देखरेख ठेवणे.
- उघड्यावर कचरा टाकणे किंवा कचरा जाळण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे आणि कारवाईचा आढावा घेणे.
- कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते की नाही, याची पडताळणी करणे.
- नागरिकांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहिमा राबवणे.
- राज्य शासनाला वेळोवेळी अनुपालन अहवाल सादर करणे.
“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या विशेष कक्षाला पूर्ण सहकार्य करावे, जेणेकरून रत्नागिरी जिल्हा घनकचरा व्यवस्थापनात आदर्श ठरेल,” असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनधिकृत कचरा डेपो, प्रदूषण करणारे घटक आणि निष्काळजीपणाने कचरा व्यवस्थापन करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, ‘स्वच्छ रत्नागिरी’ मोहिमेला यामुळे मोठी बळकटी मिळणार आहे.

