(मुंबई)
राज्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाणार असून सुमारे १३ हजार पदे भरण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. यामध्ये माध्यमिक शाळांमधील सुमारे ९ हजार आणि जिल्हा परिषद (झेडपी) शाळांमधील सुमारे ४ हजार पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी आधीच १ लाख ७० हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
राज्यातील सुमारे १७ हजार अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास १५ हजार पदे रिक्त आहेत. तसेच प्राथमिक शाळांमध्येही मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कमतरता आहे. १ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार, संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या सुमारे १२ ते १३ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन सध्या सुरू आहे. हे समायोजन ३० एप्रिलपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम केली जाईल. त्यानंतर मे महिन्यात ‘पवित्र’ पोर्टलवर एकाचवेळी भरती जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. उमेदवारांना माध्यमिक शाळांसाठी ५० आणि सरकारी शाळांसाठी १०० शाळांचा पसंतीक्रम देण्याची संधी दिली जाईल.
भरती प्रक्रियेत खासगी अनुदानित शाळांसाठी गुणवत्ता यादीतून प्रत्येक पदासाठी तीन उमेदवार मुलाखतीसाठी पाठवले जातील, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पदे गुणवत्ता यादीनुसार थेट भरली जाणार आहेत.
टीईटी अट कायम
इयत्ता पहिली ते आठवीसाठी शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) अट कायम असून, १ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व शिक्षकांना दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती लागू शकते. त्यामुळे २१ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समायोजनानंतरच अंतिम आकडेवारी
माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पुढील काही दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतरच रिक्त पदांची अंतिम संख्या स्पष्ट होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही भरती ८ ते ९ हजारांच्या दरम्यान राहू शकते, अशी मिळत आहे.
भरतीचा आढावा:
अनुदानित माध्यमिक शाळा : १७,१५७
माध्यमिक भरती (अंदाजे) : ९,०००
झेडपी व अन्य शाळा : ७०,०००
झेडपी भरती : ४,०००
एकूण भरती : १३,०००

