(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सागरी सुरक्षेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलीस दलाने एक अभिनव आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून भारतात प्रथमच ‘स्वॅम्प पोलीस’ गस्त उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज, शुक्रवारी दुपारी ४ वाजता नारायणमळी (नाचणे) येथे होणार आहे.
विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी खाडीकिनारे, दाट कांदळवनं आणि दलदलीचे संवेदनशील भाग आहेत. या दुर्गम परिसरात पारंपरिक बोटी किंवा वाहनांद्वारे गस्त घालणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. या पार्श्वभूमीवर कायक बोटींच्या साहाय्याने गस्त घालण्याची ही संकल्पना साकारण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात असून, कायक चालविणे, दलदलीत मार्गक्रमण करणे तसेच आपत्कालीन बचावकार्याची तंत्रे आत्मसात करण्यावर भर देण्यात येत आहे. कायक बोटींच्या मदतीने अरुंद खाड्या आणि कांदळवनांच्या आतपर्यंत सहज पोहोचता येणार असल्याने, लपूनछपून होणाऱ्या अवैध हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
तसेच, दलदलीच्या भागात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास ‘स्वॅम्प पोलीस’ पथक तात्काळ प्रतिसाद देऊ शकणार आहे. सागरी सुरक्षेबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचावकार्य अधिक परिणामकारक करण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. राज्यातच नव्हे, तर देशभरात आदर्श ठरेल असा हा प्रयोग असल्याचे मानले जात असून, या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे रत्नागिरी पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

