( रत्नागिरी /प्रतिनिधी )
देवरूख येथील अपहरण, खंडणीची मागणी आणि दरोड्याच्या गाजलेल्या प्रकरणातील संशयित आरोपी सागर प्रकाश कदम याला बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी १ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशात, उपलब्ध प्रथमदर्शनी तपास सामग्रीच्या आधारे अर्जदाराचा मुख्य गुन्ह्याच्या नियोजनात, अपहरणात, खंडणीच्या मागणीत किंवा दरोड्यात थेट सहभाग दिसून येत नसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. मात्र, ही निरीक्षणे केवळ जामीन अर्जापुरती मर्यादित असून खटल्याच्या अंतिम सुनावणीवर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या २०२३ मधील कलम ३०९(४), ३१०(१), ३११, १४०(२), १२७(२), ११५(२), ३५१(२) आणि ३१७(३) अशा गंभीर कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सप्टेंबर २०२५ मध्ये देवरूख–साखरपा मार्गावर धनंजय गोपाळ केतकर या सराफ व्यावसायिकाचे कथित अपहरण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटण्यात आले तसेच पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सागर कदम याला २० नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती.
जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान अर्जदाराच्या वतीने ॲड. राकेश भाटकर, ॲड. आर्य आंबुलकर आणि ॲड. वैभव अरागे यांनी बाजू मांडली. अर्जदाराला केवळ सहआरोपींच्या जबाबांच्या आधारे गुन्ह्यात गोवण्यात आले असून अपहरण, खंडणी किंवा दरोड्याच्या कटात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कोणताही स्वतंत्र पुरावा उपलब्ध नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाच्या कथनानुसारही अर्जदाराची भूमिका ही कथितरित्या गुन्हा घडल्यानंतर वापरण्यात आलेले रिव्हॉल्व्हर नदीत फेकून पुरावा नष्ट करण्यापुरती मर्यादित असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दुसरीकडे, सरकार पक्षाने जामीन अर्जाला कडाडून विरोध करत हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे नमूद केले. अर्जदाराविरुद्ध पूर्वीचे गुन्हे नोंद असल्याचा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र लपवून महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्यामध्ये त्याची भूमिका असल्याचा दावा सरकार पक्षाने केला. जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची किंवा पुराव्याशी छेडछाड होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर आणि आरोपपत्रासह तपास कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, तपासातील उपलब्ध सामग्रीनुसार अर्जदाराची भूमिका ही मुख्य घटना घडल्यानंतर कथित शस्त्राची विल्हेवाट लावण्यापुरतीच मर्यादित असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. अपहरणाचा कट रचणे, फिर्यादीचे अपहरण करणे, खंडणीची मागणी करणे किंवा दरोडा घालणे या मुख्य आरोपांमध्ये संशयित आरोपी सागर कदमचा थेट सहभाग असल्याचे या टप्प्यावर उपलब्ध सामग्रीतून स्पष्ट होत नाही. न्यायालयाने रिव्हॉल्व्हर जप्तीच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले. मुख्य आरोपीला अटक झाल्यानंतर नदीत शोधमोहीम राबवूनही शस्त्र सापडले नव्हते. त्यानंतर संशयित सागर कदमला अटक झाल्यानंतर त्याच्या कथित माहितीवरून शस्त्र जप्त करण्यात आल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. मात्र, या जप्तीची विश्वासार्हता आणि पुराव्याचे मूल्य हे खटल्यादरम्यान तपासले जाईल. त्यामुळे या टप्प्यावर त्याबाबत अंतिम मत व्यक्त करणे उचित ठरणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
अर्जदाराविरुद्ध काही पूर्वीचे गुन्हे नोंद असल्याचे मान्य करतानाही, सध्या या गुन्ह्यातील त्यांची भूमिका स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाले असून सागर कदम हा गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याला आणखी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार, संशयित सागर प्रकाश कदम याला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचे दोन सक्षम जामीनदार सादर करण्याच्या अटीवर नियमित जामीन मंजूर करण्यात आला.
तसेच खटला संपेपर्यंत प्रत्येक दोन महिन्यांनी संबंधित तपास अधिकाऱ्यासमोर हजेरी लावणे, प्रत्येक सुनावणीला न्यायालयात उपस्थित राहणे, आरोप निश्चित होईपर्यंत न्यायालयीन कामकाज किंवा पोलीस ठाण्यातील हजेरी वगळता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश न करणे, साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे, पुराव्याशी छेडछाड न करणे आणि राहत्या पत्त्याची माहिती तपास अधिकाऱ्याला देणे अशा कठोर अटीही न्यायालयाने घातल्या आहेत. दरम्यान, न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, या आदेशातील सर्व निरीक्षणे ही केवळ जामीन अर्जावरील प्रथमदर्शनी विचारापुरती मर्यादित आहेत. त्यामुळे खटल्याच्या अंतिम सुनावणीदरम्यान पुराव्यांच्या आधारे निर्णय घेताना या निरीक्षणांचा कोणताही परिणाम होणार नाही.

