(नाशिक / निफाड)
रानवड (निफाड) येथे राहणाऱ्या एका मजुराने पत्नीशी झालेल्या किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलत आपल्या तीन लहान मुलांसह नजीकच्या पालखेड डाव्या कालव्यात उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या दुर्दैवी प्रकारात वडील आणि तीनही मुलांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये दीपक पोपट पवार (वय ३०) यांच्यासह त्यांची मुले वीर (५), प्रसाद (३) आणि अविनाश (दीड वर्ष) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीशी वाद झाल्यानंतर दीपक पवार यांनी मुलांना केस कापण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर ते थेट पालखेड डाव्या कालव्यावरील चारी क्रमांक १० येथे गेले. येथे त्यांनी प्रथम दोन मुलांना पाण्यात ढकलले आणि नंतर दीड वर्षाच्या मुलाला छातीशी धरून स्वतः कालव्यात उडी घेतली.
ही घटना परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने आरडाओरड करून मदतकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दीपक पवार यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कालव्याचे पाणी बंद करण्यास सांगितले. पाणी कमी झाल्यानंतर दीपक पवार यांचा मृतदेह सापडला. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षाच्या अविनाशचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. दीपक पवार, त्यांची पत्नी पूजा आणि भाऊ राहुल हे गेल्या सात वर्षांपासून शिवप्रसाद वाघा वायनरी येथे काम करत होते. घटनेच्या दिवशी कुटुंबात काही कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस पुढील तपास करत आहेत.

