(रत्नागिरी)
कोकणातील शेती रासायनिक खतांच्या विळख्यातून मुक्त करून शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोकण विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळा’ दापोली येथे उत्साहात पार पडली. सर विश्वेश्वरैय्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला कोकण विभागातून तब्बल १,२५० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ‘नैसर्गिक शेती’ या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : आंबा, काजू आणि भातशेतीवर विशेष भर
तांत्रिक सत्रात अहमदाबाद येथील बन्सी गीर गोशाळेचे गोपाळभाई सुतारिया यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि तंत्र समजावून सांगितले. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल माळी आणि डॉ. अशोककुमार चव्हाण यांनी आंबा, काजू, मसाले पिके, भात आणि नाचणीमध्ये नैसर्गिक शेतीचा अवलंब कसा करावा, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
सुनील चोत्कर (संचालक, पुणे) यांनी शासकीय धोरणांची माहिती दिली, तर विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी कार्यशाळेची पार्श्वभूमी आणि उद्देश स्पष्ट केला. संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांनी शेतीतील भविष्यातील संधी व आव्हानांवर भाष्य केले.
दुपारच्या सत्रात कौस्तुभ देशपांडे यांनी गो-आधारित शेतीची उपयुक्तता स्पष्ट केली.
शेतकऱ्यांच्या शंकांचे तत्काळ निरसन
नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण कसे करावे, याबाबत प्रशांत नाईकवाडी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले तसेच विविध शंका उपस्थित केल्या, ज्यांचे तज्ज्ञांनी समाधानकारक निरसन केले.
नैसर्गिक शेती ही काळाची गरज
रासायनिक शेतीला सक्षम पर्याय म्हणून नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० पर्यंत चाललेल्या या कार्यशाळेमुळे कोकणातील शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

