(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नंबर २ गाणसुरवाडी तालुका रत्नागिरी या शाळेची स्थापना २५ एप्रिल १९४९ रोजी झालेली असून यावर्षी या शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने या शाळेचा “अमृत महोत्सव” सोहळा व नव्याने बांधण्यात आलेल्या चार वर्ग खोल्यांच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.उदयजी सामंत यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र सामंत, गटविकास अधिकारी चेतन शेळके, गटशिक्षण अधिकारी वैभव डुबल, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, कळझोंडी केंद्रांचे केंद्रप्रमुख जयदीप यादव, उद्घाटन समिती जि. प. शाळा कळझोंडी नं.२ अध्यक्ष तुकाराम फडकले, शाळा व्यवस्थाप समिती अध्यक्ष नरेश निंबरे ,शिक्षणप्रेमी वासुदेव निंबरे, मुंबई कमिटी अध्यक्ष संतोष निंबरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, देणगीदार यांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहेत. यावेळी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांचा हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम व माजी विद्यार्थी देणगीदारांचाही सत्कार करण्यात येणार आहे. तसेच माजी विद्यार्थी संघ यांचे वतीने सांस्कृतिक कार्यक्रम (जि.प. शाळा कळझोंडी नं. २ गाणसूरवाडी.) व श्री स्वामी समर्थ कला मंच निर्मित नाट्य कलाकृती “उंबरटयावरी माप ठेविले” सादर करण्यात येणार आहे.
सदर अमृत महोत्सव सोहळा व नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ व शालेय विविध उपक्रमात सहभागी होऊन समस्त ग्रामस्थ बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कळझोंडी केंद्र प्रमुख जयदीप यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश निंबरे, उद्घाटन समारंभ समितीचे अध्यक्ष तुकाराम फडकले यांनी केले आहे.

