(पोलादपूर / शैलेश पालकर)
पोलादपूरजवळील रानबाजिरे गावातील सोनारवाडी येथील एका तरुणाचा सावित्री नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव गणेश एकनाथ पारकर असे असून तो सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर–महाबळेश्वर मार्गालगतच्या सावित्री नदीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, पाण्याची खोली अचूक न समजल्याने तो बुडाला. घटनेनंतर स्थानिकांनी शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.
या प्रकरणी योगेश पारकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृतदेहाचे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कदम या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, याच ठिकाणी सुमारे पाच वर्षांपूर्वीही अशीच घटना घडल्याची चर्चा असून, स्थानिकांकडून या परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे.

