(दापोली)
दापोली बाजारपेठेतील एका नामांकित इलेक्ट्रिक दुकानातून नामवंत कंपनीच्या नावाखाली बनावट इलेक्ट्रिकल वायरची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संबंधित दुकानदारावर कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, सुमारे १ लाख ३८ हजार ७६० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.
हैदराबाद येथील नागेश्वरराव कृष्णमुर्ती नंदीगामा (वय ४६) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दापोली बाजारपेठेतील इलेक्ट्रिक दुकानाचे मालक सुनील अनंत पालटे (वय ५८, रा. उदयनगर, दापोली) हे ‘POLICAB’ (पॉलिकॅब) या नामांकित कंपनीच्या नावाचा करून अन्य वायरची विक्री करत होते.
बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:५० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला. यावेळी पॉलिकॅब कंपनीच्या मूळ उत्पादनासारख्या दिसणाऱ्या नकली वायर विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले.
या प्रकरणी आरोपी सुनील पालटे यांच्यावर कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्यांतर्गत (कॉपीराईट अॅक्ट १९५७ तसेच सुधारित अधिनियम १९८४ व १९९४) कलम ५१ व ६३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

