(खेड /रत्नागिरी)
लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजच्या लोटे वसाहतीतील पीफास (PFAS) उत्पादनाविरोधात गेल्या ७६ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवे स्वरूप देण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. कोकण नागरी संघर्ष समितीचे धरणे आंदोलनकर्ता Ashokrao Jadhav यांनी ही माहिती देत, यापुढे परिसरातील प्रत्येक गावाने आलटून-पालटून आंदोलनस्थळी उपस्थित राहून साखळी पद्धतीने लढा अधिक व्यापक करण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट केले.
पीफास या कथित घातक उत्पादनाच्या विरोधात ८ जानेवारी रोजी माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली कंपनीविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी २० जानेवारीपर्यंत कंपनीने उत्पादन बंद करण्याबाबत निर्णय न घेतल्यास २१ जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार २१ जानेवारीपासून कंपनीच्या एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ६० समोरील प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरू केले. गेल्या अडीच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनाकडे उद्योगमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्डसहसह संबंधित शासकीय यंत्रणांनी अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
६ एप्रिल रोजी कंपनी, शासन आणि राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षक समिती आणि परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांनी संयुक्तपणे निषेध मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान आंदोलनाची दिशा बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यानुसार आता परिसरातील प्रत्येक गावाने एक दिवस आंदोलनस्थळी मुक्काम करून साखळी आंदोलन राबवायचे ठरवले आहे. या नव्या रणनीतीमुळे येत्या काही दिवसांत लक्ष्मी ऑरगॅनिक्सविरोधातील जनआंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परिसरातील पर्यावरण, आरोग्य आणि भविष्यातील परिणामांचा प्रश्न उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे पुढे आणली आहे.

