(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संघटनात्मक हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “काम करा, अन्यथा पद सोडा” असा कडक संदेश देत त्यांनी निष्क्रिय नेत्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील कामगिरी आणि संघटनेतील मरगळ दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.
बैठकीत बोलताना शिंदे यांनी राज्यातील तब्बल 43,000 गावांमध्ये शिवसेनेची संघटना मजबूत करण्याचे मोठे लक्ष्य दिले. केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता गावागावात पोहोचून पक्षाची मुळे घट्ट करण्यावर त्यांनी भर दिला. “कार्यकर्ते आणि नेते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले नाहीत, तर संघटना अपूर्णच राहते,” असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात कोणतीही मोठी निवडणूक नसल्याने या वेळेचा उपयोग संघटन विस्तारासाठी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिंदे स्वतः मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेत असून, कोणतीही पूर्वसूचना न देता संघटनात्मक कामांची पडताळणी करणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा संपर्कप्रमुखांना त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र बैठक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. “फक्त बैठक घेऊ नका, तर त्याचे फोटो आणि तपशील दररोज मला पाठवा. प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष असेल,” असे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच निवडणूक आयोगाच्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेअंतर्गत मतदार यादींचे पुनरावलोकन करण्यावरही त्यांनी भर दिला. प्रत्येक मतदारसंघात दोन बीएलए (Booth Level Agents) नेमून दररोज संवाद साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “किती दौरे केले? किती बैठका घेतल्या?” असा थेट जाबही त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला. केवळ पद धारण करून चालणार नाही. ज्यांच्याकडे ठोस कामाचा अहवाल नाही किंवा जे नावापुरते पद भूषवत आहेत, त्यांना तात्काळ हटवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मतदारसंघांच्या बदललेल्या रचनेचा विचार करून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. एकूणच, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

