(मुंबई)
महाराष्ट्राच्या शाश्वत आणि वेगवान विकासाला मोठी चालना देणारी ऐतिहासिक गुंतवणूक जाहीर झाली आहे. व्हिएतनाममधील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी Vingroup राज्यात सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ₹50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि Mumbai Metropolitan Region Development Authority यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या गुंतवणुकीअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश (MMR) तसेच रायगड परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारले जाणार असून पुढील दोन वर्षांत सुमारे 5,000 एकर क्षेत्रावर विकासकामे सुरू होतील. या माध्यमातून जवळपास 24,700 थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता असून अप्रत्यक्ष रोजगाराची संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. राज्यात सुरू असलेल्या पायाभूत विकासाच्या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या कराराचा मुख्य फोकस स्मार्ट आणि शाश्वत शहरी विकासावर आहे. सुमारे 2,700 एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची, पर्यावरणपूरक आणि एकात्मिक स्मार्ट टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. सुमारे दोन लाख लोकसंख्या लक्षात घेऊन या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत असून आधुनिक सुविधा, हरित तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट नागरी व्यवस्थापन यावर भर दिला जाणार आहे. यामुळे मुंबई आणि रायगड परिसराचा शहरी चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रातही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. राज्यात 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून हरित ऊर्जेला चालना मिळणार आहे. तसेच इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना आहे. यासोबतच ‘मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस’ प्लॅटफॉर्म विकसित करून शहरातील वाहतूक अधिक सुलभ आणि स्मार्ट करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यभर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क उभारण्याचाही महत्त्वाकांक्षी आराखडा आहे.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही या गुंतवणुकीचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. VinSchoolच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारल्या जातील, तर Vinmecच्या माध्यमातून आधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल.
पर्यटन क्षेत्रालाही या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे. सुमारे 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क, प्राणी संग्रहालय आणि सफारी विकसित केली जाणार असून हा प्रकल्प राज्याच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
या गुंतवणुकीबाबत बोलताना देवेद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, “ही भागीदारी महाराष्ट्राला शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिमान वाहतूक व्यवस्थेकडे नेणारी ठरेल.” एकूणच, या करारामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक, शहरी आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार असून राज्याला जागतिक गुंतवणूक नकाशावर अधिक मजबूत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

