(मुंबई)
कोकणवासीयांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर असून सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण आता ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
कोकण रेल्वेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर आता अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेचे ‘शिल्पकार’ म्हणून ओळख
मधु दंडवते हे कोकण रेल्वे प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार मानले जातात. रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी कोकण रेल्वेसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कोकणातील वाहतूक आणि विकासाला मोठी चालना मिळाली.
१९९० च्या दशकात कोकणातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि उच्च विचारसरणी यामुळे ते जनतेत लोकप्रिय होते. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे, प्रभावी वक्तृत्वामुळे आणि कोकण रेल्वेसाठी केलेल्या योगदानामुळे ते कोकणातील अत्यंत लोकप्रिय नेते मानले जात होते.
सलग सहा वेळा राजापूरचे खासदार
मधु दंडवते हे सलग सहा वेळा राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. १९७१ मध्ये ज्येष्ठ नेते बॅ. नाथ पै यांच्या निधनानंतर त्यांनी राजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यांनी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात १९७७ मध्ये रेल्वेमंत्री तर व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात १९८९ मध्ये अर्थमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानक नामकरणासह एकूण चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय समाविष्ट आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव देण्याची मागणी कोकणातून अनेक वर्षांपासून होत होती. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही मागणी प्रत्यक्षात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

