(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री. धोंडू हरी डिके यांची निवड झाल्यानंतर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास पंचायत समिती सदस्या सौ. अपर्णा जाधव, सरपंच रामचंद्र हरेकर, आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्रजी सुर्वे, अरविंद जाधव, विजय शेठ कुवळेकर, कृष्णाजी हरेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीकांत डिके, पोलीस पाटील सौ. वर्षा सुर्वे, संजय ओकटे, पत्रकार रमेश डिके, संतोष जाधव, आप्पा फडकले, बाळाराम डिके, नंदकुमार फडकले, तुकाराम येलोंडे, काशिनाथ हरेकर, कृष्णा नाडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. डिके यांना ग्रामस्थांनी सलग चार कार्यकाळ बिनविरोध निवडून दिले असून, निस्वार्थी समाजसेवा, ग्रामविकासाबाबतची तळमळ आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी गावकऱ्यांचा दृढ विश्वास संपादन केला आहे. विकासकामांना गती देणे, गावातील विविध प्रश्न मार्गी लावणे आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न उल्लेखनीय ठरला आहे. यावेळी सरपंच रामचंद्र हरेकर यांच्या हस्ते श्री. डिके यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात अरविंद जाधव, आप्पा फडकले, सौ. वर्षा सुर्वे, संजय ओकटे, राजेंद्रजी सुर्वे, सरपंच रामचंद्र हरेकर आणि सौ. अपर्णा जाधव यांनी मनोगत व्यक्त करत श्री. डिके यांच्या कार्याचा गौरव केला तसेच उपसरपंच म्हणून त्यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक यांनी केले.

