(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जंगलवाडीचे मुख्याध्यापक महेश गणपत कांबळे यांची नुकतीच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जंगलवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्नीक भेटवस्तू, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
महेश कांबळे यांनी गेली दोन वर्षे जंगलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या शांत, साध्या, मनमिळाऊ आणि विद्यार्थीकेंद्री स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी शैक्षणिक सहली, वनभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सहशालेय उपक्रम तसेच पालकांचा सक्रिय सहभाग वाढविणारे अनेक उपक्रम राबविले. याशिवाय ‘मंथन’ सारख्या स्पर्धा परीक्षेचे केंद्रस्तरीय आयोजनही त्यांनी यशस्वीपणे केले. त्यांच्या कार्यामुळे शाळा आणि गाव यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला.
रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून शिक्षण विस्तार अधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या बदलीनिमित्त ग्रामस्थांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांचा विशेष सत्कार केला. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप गार्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गावकर व माजी शिक्षक यशवंत घागरे, शिक्षणतज्ज्ञ कृष्णा घागरे, पोलीस पाटील विजित साळवी, स्नेहल घागरे, माजी मुख्याध्यापिका नेहा दर्डी, दर्डी गुरुजी, सुनील घागरे, शंकर गार्डी, ग्रामपंचायत सदस्य योगेश गार्डी, सुरेश हतपले, संजय घागरे, मोहन गार्डी, सुभाष गार्डी, निलेश गराटे, निलेश गार्डी, मुख्याध्यापक सीताराम करंबेळे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विजित साळवी, सुरेश हतपले, निलेश गार्डी, स्नेहल घागरे, नेहा दर्डी, कृष्णा घागरे आणि यशवंत घागरे यांनी मनोगत व्यक्त करत कांबळे यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना महेश कांबळे म्हणाले, “जंगलवाडीतील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांकडून मला नेहमीच भरभरून प्रेम आणि सहकार्य मिळाले. या गावातून निरोप घेताना मन भरून आले आहे. येथे मिळालेले प्रेम, सहकार्य आणि आठवणी आयुष्यभर जपून ठेवेन.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम करंबेळे यांनी केले.

