(मुंबई)
मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी ६’ अखेर ग्रँड फिनालेसह रविवारी रात्री संपन्न झाला असून तन्वी कोलते हिने महाविजेतीचा मान पटकावला आहे. तब्बल १०० दिवसांच्या या रोमांचक प्रवासाचा शेवट अत्यंत रंगतदार पद्धतीने झाला आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या तन्वीने ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजेतेपदासोबत तन्वीला १५ लाख रुपये रोख रक्कम, बिग बॉसची आकर्षक ट्रॉफी, पु. ना. गाडगीळ अँड सन्सकडून १० लाखांचे व्हाउचर आणि तुनवाल ई-मोटर्सची ‘लिथिनो प्रो’ ही ई-बाईक प्रदान करण्यात आली. याशिवाय अभिनेता रितेश देशमुख आणि ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर फोटोही तिला भेट देण्यात आला.
या रियालिटी शोममधील दमदार कामगिरीने तन्वीने साखरप्यासह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्यासह देशात गाजवले आहे. तन्वी कोलते ही मूळ साखरपा, संगमेश्वर परिसरातील रहिवासी असून, तिने ‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक टास्कमध्ये खंबीर भूमिका घेतली होती. कठीण प्रसंगातही न डगमगता तिने प्रत्येकवेळी आपले मत ठामपणे मांडले. तिच्या स्वभावातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि खेळातील सातत्य यामुळे ती इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरल्याने ती विजयी झाली आहे.
तन्वी कोलते ही मूळ साखरपा, संगमेश्वर परिसरातील रहिवासी असून, तिने ‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक टास्कमध्ये खंबीर भूमिका घेतली आहे. कठीण प्रसंगातही न डगमगता तिने आपले मत ठामपणे मांडले. तिच्या स्वभावातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि खेळातील सातत्य यामुळे ती इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरली आहे.
तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या सिझनमध्ये एकूण १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १०० कॅमेरांच्या नजरकैदेत राहून त्यांनी प्रेक्षकांना वाद, भांडणं, मैत्री, भावनिक क्षण आणि नात्यांचे विविध रंग अनुभवायला दिले. या सिझनचा ग्रँड फिनाले मुंबईत पार पडला आणि ज्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती तो क्षण अखेर आला. अंतिम फेरीत राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद या स्पर्धकांना मागे टाकत तन्वीने विजेतेपद मिळवले. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन हे स्पर्धक रेसमध्ये होते. पाचही स्पर्धकांनी मास्टरमाईंडने प्रत्येक टास्क पूर्ण केले. शेवटी २ स्पर्धक उरले होते. तन्वी कोलतेने सहाव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
टॉप ५ चं एलिमिनेशन
रितेश देशमुख टॉप ५ स्पर्धकांना ऍक्टिव्हिटी रूममध्ये बोलावतो आणि प्रत्येकाला स्वतःला एलिमिनेट करण्याची संधी देतो. जो स्पर्धक स्वतःला एलिमिनेट करेल त्याला पाच लाखांचा धनादेश देण्यात येईल, असं रितेश सांगतो. मात्र कोणीही बझर दाबत नाही. त्यामुळे रितेश प्रेक्षकांच्या व्होटिंगनुसार दीपाली सय्यद एलिमिनेट झाल्याचं सांगतो. दीपाली सय्यदनंतर टॉप ५ च्या रेसमधून अनुश्री माने बाद होते. पुढे, तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यापैकी विशाल बाद होतो.
तन्वी कोलतेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास विशेष ठरला. सुरुवातीपासूनच बिनधास्त आणि स्पष्टवक्तेपणामुळे ती चर्चेत राहिली. जिथे अन्याय दिसला तिथे तिने ठामपणे आवाज उठवला, तर दुसरीकडे घरातील सदस्यांसोबत प्रेमळ नातेसंबंधही जपले. प्रभू शेळकेसोबतची तिची मैत्री विशेष गाजली. या सिझनमध्ये दोन वेळा कॅप्टन होणारी ती एकमेव स्पर्धक ठरली. सुरुवातीला तिच्या स्वभावामुळे तिला होस्ट रितेश देशमुख यांचा ओरडाही सहन करावा लागला, मात्र नंतर तिने स्वतःमध्ये बदल करत उत्कृष्ट खेळ सादर केला आणि अखेर विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.

तन्वी कोलते ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर म्हणून आधीपासूनच लोकप्रिय होती. इंस्टाग्रामवरील रील्स, फॅशन आणि लाइफस्टाइल व्हिडिओंमुळे तिने मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. तिच्या एक्सप्रेसिव्ह स्टाइल आणि नैसर्गिक अभिनयामुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. बिग बॉसच्या मंचामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली असून आता ती मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रभावी चेहरा बनली आहे. ‘बिग बॉस मराठी ६’ हा सिझन प्रेक्षकांसाठी अत्यंत रंजक ठरला आणि त्यामध्ये तन्वी कोलतेचा प्रवास विशेष लक्षवेधी राहिला. तिचा आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा आणि सातत्यपूर्ण खेळ यामुळेच तिने हे विजेतेपद पटकावले असल्याचे मानले जात आहे.
विजेती ठरल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तन्वी म्हणाली की, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला आणि प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून.”

