(नाशिक)
शहरात आधीच गाजत असलेल्या अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक, मानसिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील एका प्रतिष्ठित MNC कंपनीत काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून महिला सहकाऱ्यांवर लैंगिक छळ, मानसिक त्रास आणि धार्मिक भावना दुखावण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल झाले असून 6 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
नाशिकमध्ये अलिकडेच उघडकीस आलेल्या अत्याचारांच्या मालिकेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासगी कंपन्यांनी कार्यस्थळी महिलांसाठी अधिक कडक सुरक्षा धोरणे लागू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराविरोधात पुढे येण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे:
- 📱 WhatsApp: 9923323311
- 🚨 आपत्कालीन मदत: 112
तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

