( संगमेश्वर )
गाडी क्रमांक 06013 / 06014 (थिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – थिरुवनंतपुरम सेंट्रल) या समर स्पेशल गाड्यांना संगमेश्वर रेल्वे स्थानकावर थांबा न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या गाड्यांना माणगाव, रोहा, मडगावसह पुढील अनेक स्थानकांवर थांबे देण्यात आलेले असताना, संगमेश्वरसारख्या महत्त्वाच्या स्थानकाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
संगमेश्वर रेल्वे स्थानक हे कोकणातील एक प्रमुख प्रवासी केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. विशेष म्हणजे, या स्थानकातून वार्षिक सुमारे सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असूनही संबंधित गाड्यांना थांबा न देणे आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, या समर स्पेशल गाड्यांमध्ये अनेकदा शेकडो जागा रिक्त राहत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे संगमेश्वर येथे थांबा दिल्यास प्रवाशांची मोठी सोय होण्याबरोबरच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असा स्थानिकांचा दावा आहे.
या पार्श्वभूमीवर “निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला अधिकृत पत्र देऊन तातडीने थांबा देण्याची मागणी केली आहे. या मागणीला स्थानिक नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून, संगमेश्वर येथे लवकरात लवकर समर स्पेशल गाड्यांचा थांबा द्यावा, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.

