(नागपूर)
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोनेगाव पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास अटक केली. त्यांना कारागृहात नेत असताना, त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ साली नागपूर विमानतळावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शासकीय स्वीय सहाय्यकाला त्यांनी शिविगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यावर त्यांना सातत्याने समन्स पाठवून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात येत होते.
मात्र, ते कोणत्याही तारखेवर हजर न झाल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरन्ट काढला. त्यामुळे आज सोमवारी (ता.१७) ते न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने सोनेगाव पोलिसांना सूचना देत, त्यांना बोलावून घेत, जाधव यांना अटक करण्यास सांगितले. याशिवाय त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
दरम्यान त्यांना कारागृहाकडे नेत असताना, अचानक अस्वस्थ वाटत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून डॉक्टरांकडून तपासणी सुरू केली आहे.