(मुंबई)
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू असताना, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी या भामट्यांना त्यांच्या पद्धतीनेच धडा शिकवला आहे. एका खास सायबर जनजागृती लघुपटात नानांनी चक्क सायबर ठगालाच जाळ्यात ओढत त्याच्याकडून 60,000 रुपये उकळल्याचे दाखवण्यात आले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सायबर फसवणुकीविरोधात जनजागृती वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘स्कॅम फाइल्स’ नावाचा 5.27 मिनिटांचा हा लघुपट सादर केला आहे. ड्रीम गर्ल आणि विकी विद्या का वो वाला व्हिडिओचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून, लीना शर्मा, किशोर सोनी आणि आदिल इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा लघुपट कानपूरमध्ये घडलेल्या ‘डिजिटल अटक’ प्रकरणावर आधारित आहे.
लघुपटात नाना पाटेकरांना एक कॉल येतो. समोरचा व्यक्ती स्वतःला मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे सांगत, तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असून तातडीने अटक होईल, अशी धमकी देतो. प्रकरण मिटवण्यासाठी तो 15 लाख रुपयांची मागणी करतो. अनेक जण अशा कॉलला घाबरतात, मात्र इथे नानांनी परिस्थिती ओळखून खेळीमेळीने डाव उलटा फिरवला.
“सध्या रोख पैसे नाहीत. बायकोचे दागिने गहाण आहेत. ते सोडवण्यासाठी 35,000 रुपये कमी पडत आहेत. तेवढे पाठवले तर दागिने सोडवून तुम्हाला 15 लाख देतो,” असे नाना आपल्या खास अभिनय शैलीत सांगतात. 15 लाखांच्या आमिषाने भुललेला सायबर ठग कोणतीही शंका न घेता 35,000 रुपये ट्रान्सफर करतो. काही वेळाने नाना पुन्हा फोन करून आणखी 25,000 रुपये मागतात आणि तेही मिळतात. अखेर ठगाला कळते की समोर नाना पाटेकर आहेत आणि आपणच 60,000 रुपयांचा चुना लावून घेतला आहे.
ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही. उत्तर प्रदेशचे DGP राजीव कृष्ण यांनी सांगितले की, कानपूरमधील एका जागरूक नागरिकाने प्रत्यक्षात अशाच प्रकारे सायबर ठगांकडून पैसे वसूल केले होते. त्या घटनेवर आधारित प्रभावी मांडणीसाठी पोलिसांनी नाना पाटेकरांची मदत घेतली आहे.
हा लघुपट राज्यातील चित्रपटगृहांमध्ये मुख्य सिनेमापूर्वी दाखवला जाणार असून, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
डिजिटल अरेस्टपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या सूचना:
- पोलीस किंवा सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉलवरून अटक करत नाहीत.
- फोनवर पैसे मागणारा अधिकारी असेल, तर तो फसवणूकच असते.
- अनोळखी लिंकवर क्लिक करणे आणि संशयास्पद खात्यात पैसे पाठवणे टाळा.
- नाना पाटेकरांच्या या प्रभावी भूमिकेमुळे सायबर सुरक्षेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत अधिक ठामपणे पोहोचत आहे.

