(मुंबई)
देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीत मोठा बदल होत असून 10 एप्रिल 2026 पासून सर्व टोल प्लाझांवर कॅश पेमेंट पूर्णपणे बंद होणार आहे. Ministry of Road Transport and Highways (MoRTH) ने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून यामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
National Highways Authority of India (NHAI) च्या माहितीनुसार, टोल भरण्यासाठी FASTag हा मुख्य पर्याय असेल. ज्या वाहनांकडे वैध FASTag नसेल, त्यांना UPI द्वारे पेमेंट करता येईल; मात्र अशा वेळी वाहनधारकांना लागू टोलच्या 1.25 पट रक्कम भरावी लागेल. त्यामुळे प्रवाशांनी FASTag सक्रिय ठेवणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
MoRTH च्या अधिसूचनेनुसार, FASTag नसताना टोल पार करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. यामध्ये ई-नोटीस किंवा दंडाचा समावेश असणार आहे. हे नियम देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू राहतील.
दरम्यान, 1 एप्रिल 2026 पासून FASTag वार्षिक पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. आता हा पास 3,075 रुपयांना उपलब्ध असून यापूर्वी तो 3,000 रुपयांना मिळत होता. सध्या 50 लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी हा पास सक्रिय केला असून 26.55 कोटींहून अधिक व्यवहार नोंदवले गेले आहेत. राष्ट्रीय महामार्गांवरील एकूण कार व्यवहारांपैकी सुमारे 28 टक्के व्यवहार या पासद्वारे होत आहेत.
FASTag वार्षिक पास ही एक प्रीपेड टोल योजना असून वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी ती अधिक सोयीची ठरते. या योजनेमुळे 60 किलोमीटर परिसरातील टोल प्लाझांवरील समस्या कमी होतात, तसेच एकाच व्यवहारातून वर्षभर टोल पेमेंटची सुविधा मिळते. यासाठी नवीन FASTag घेण्याची गरज नसून विद्यमान FASTag वाहन क्रमांकाशी जोडलेला आणि सक्रिय असणे आवश्यक आहे.
हा पास फक्त NHAI आणि MoRTH अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व एक्सप्रेसवेवरच लागू होणार आहे. उदाहरणार्थ, Delhi-Mumbai Expressway सारख्या मार्गांवर हा पास वापरता येईल. मात्र राज्य महामार्ग किंवा इतर प्रकल्पांवर, जसे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे किंवा समृद्धी महामार्ग, नेहमीप्रमाणेच टोल प्रणाली लागू राहणार आहे.
नवीन डिजिटल टोल प्रणालीमुळे कॅश व्यवहार पूर्णपणे बंद होणार असून प्रवाशांना आता रोख रक्कम बाळगण्याची गरज उरणार नाही. मात्र UPI पर्याय महाग असल्याने बहुतेक वाहनधारकांसाठी FASTag हा सर्वात सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे.

