(पुणे / वृत्तसंस्था)
पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला पुण्यातील बालेवाडी येथे सुरुवात झाली असून, या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले आहेत. मतमोजणी केंद्रावरील नियोजन, ऐनवेळी बदललेली नियमावली, मतपेट्यांच्या सीलचा मुद्दा आणि अधिकाऱ्यांवरील कथित दबाव यावर उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले. दुसरीकडे, मतपेट्यांमध्ये पदवीधरांच्या लग्नाचा आणि नोकरीचा प्रश्न मांडणाऱ्या चिठ्ठ्या आढळल्याची माहिती पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी दिली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतमोजणी सुरू असताना या घडामोडींमुळे निवडणूक प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना १७,५०० मते मिळाली असून, ते आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना १०,८०० मते मिळाली असून, ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रासप पुरस्कृत उमेदवार दत्तात्रय सावंत यांना १०,०८९ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे प्रतिनिधी जयंत आसगावकर यांना ८,००० मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीतील या आकडेवारीवरून प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच मतभेद पाहायला मिळाले. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या जागेवर दावा करण्यात आला होता. भाजपने हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याचे सांगत उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसही या जागेसाठी आग्रही होती.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दुसरीकडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कौस्तुभ गावडे यांना भाजपने उमेदवारी दिली. महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर मंगेश चिवटे यांनी माघार घेतली. त्यानंतर कौस्तुभ गावडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे चित्र निर्माण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनीही गावडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याची भूमिका शेवटपर्यंत मांडली.
मात्र, पुढे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन सानप यांना शिंदे यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीतील दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांना स्पष्ट करावे लागले. परिणामी, पुणे शिक्षक मतदारसंघातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांनी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. मतमोजणी केंद्रात प्रवेश करताना मोबाईल, चावी, कागद आणि पेन घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत तक्रार केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच ४२ टेबलवरील मतांची बेरीज एकत्रित केल्यानंतर योग्य जुळली पाहिजे; अन्यथा त्यावर आक्षेप घ्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मतमोजणी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोपही आसगावकर यांनी केला.
मतमोजणी केंद्रावरील नियमावलीत ऐनवेळी बदल करण्यात आल्याचा आरोप करताना आसगावकर म्हणाले की, कागद आणि पेन घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली होती. या संदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर तेही दबावाखाली असल्याचे जाणवले. निवडणूक अधिकाऱ्यांवर सरकारचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेवर उमेदवार हर्षदा देशमुख यांनीही गंभीर आक्षेप नोंदवले. मतपेट्यांच्या सीलच्या मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आल्याचे सांगून वैध आणि अवैध मतांची फेरी अद्याप बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजयी होण्यासाठी आवश्यक मतांचा कोटाही अद्याप निश्चित झालेला नसताना मतमोजणी केंद्रात पाणी आणि बिस्किटांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मतपेट्यांमध्ये पदवीधरांच्या विविध सामाजिक प्रश्नांचा उल्लेख करणाऱ्या चिठ्ठ्या आढळल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. आमच्या लग्नाकडेपण लक्ष द्या! “आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. 2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर बघा…” अशा भन्नाट मागण्या यामध्ये आढळून आल्या. पदवीधरांच्या लग्नाचा प्रश्न आणि नोकऱ्यांचा प्रश्न या चिठ्ठ्यांमधून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधरांशी संबंधित अनेक सामाजिक प्रश्न गंभीर असून, त्यावर काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. मतमोजणीच्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्याचे सांगत देशमुख यांनी निकालात निश्चितच बदल घडेल आणि महाराष्ट्राचा गोकुळ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, भाजपचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी मतमोजणी प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले. पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुका पार पडल्या असून, सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातील फिल्टरिंगची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली असून, मतांची टॅलीही करण्यात आल्याचे ते म्हणाले. पाचही जिल्ह्यांतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करत आपण निवडून येऊ, असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला.


