( मुंबई )
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत देणारी एक अत्यंत महत्त्वाची बैठक मंगळवारी उशिरा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वतंत्रपणे तसेच एकाच बैठकीत भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, अजित पवार गटातील दोन प्रमुख नेत्यांसोबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणापासून शरद पवार गटाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) प्रवेश किंवा पक्षातील काही नेत्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकांपर्यंत अनेक शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत.
राजकीय तज्ज्ञांकडून विविध तर्कवितर्क
राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी या बैठकीला अत्यंत महत्त्वाची घडामोड असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, जर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी फक्त सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल गेले असते, तर ही नियमित राजकीय बैठक मानली गेली असती. मात्र, त्याच वेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने या बैठकीचे राजकीय महत्त्व अनेकपटीने वाढले आहे.
त्यांच्या मते, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर चर्चा झाली का, शरद पवार गट NDA मध्ये सहभागी होण्याबाबत काही भूमिका घेत आहे का, किंवा त्या पक्षातील काही आमदार-खासदार स्वतंत्रपणे महायुतीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत का, याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होऊ शकते.
अर्थ खात्याच्या चर्चेचीही शक्यता
दरम्यान, अजित पवार गटातील काही नेत्यांनी या बैठकीला वेगळा संदर्भ दिला आहे. त्यांच्या मते, राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपाच्या संदर्भात विशेषतः अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, या बैठकीत जयंत पाटील यांची उपस्थिती असल्याने केवळ खातेवाटपाचा विषय चर्चिला गेला, असे मानण्यास राजकीय निरीक्षक तयार नाहीत. त्यामुळे या बैठकीमागे अधिक मोठी राजकीय रणनीती असल्याचा तर्क व्यक्त केला जात आहे.
सव्वा तास चालली बैठक, नेत्यांनी टाळली माध्यमे
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक सुमारे सव्वा तास चालली. बैठक संपल्यानंतर सर्वप्रथम सुनील तटकरे माध्यमांशी कोणतीही चर्चा न करता वर्षा बंगल्याच्या दुसऱ्या मार्गाने बाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने प्रफुल पटेल बाहेर आले. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनंतर जवळपास १५ मिनिटांनी जयंत पाटील वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. तिन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने बैठकीतील चर्चेचा तपशील पूर्णपणे गोपनीय राहिला आहे. त्यामुळे या भेटीमागील नेमके राजकीय गणित काय, याबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर बैठकीचे महत्त्व
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कथित ‘ऑपरेशन टायगर’ या राजकीय चर्चांमुळे वातावरण आधीच तापले आहे. विविध पक्षांतील आमदार आणि खासदारांना आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. अशा वेळी वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीमुळे राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीतही वेगवान राजकीय हालचाली
मुंबईतील या बैठकीसोबतच राजधानी दिल्लीतही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटातून फुटून आलेल्या काही खासदारांसह दिल्लीत दाखल झाले. तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘उबाठा’ गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, शिवसेनेत आलेल्या या सहाही खासदारांच्या आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
केंद्राच्या अखत्यारीत असणारे विविध प्रकल्प, आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी, अशी मागणी यावेळी खासदारांच्या वतीने अमित शहा यांच्याकडे करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व खासदारांचे स्वागत केले. तसेच, त्यांच्या मतदारसंघातील लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून निधी किंवा इतर कोणत्याही बाबींची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यांसारखी महत्त्वाची विधेयके संसदेत मांडली जाण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार बहुमत अधिक मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
NDA मजबूत करण्यासाठी हालचाली?
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, आगामी संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) अधिक बळकट करण्यासाठी विविध प्रादेशिक पक्षांतील नेत्यांशी संपर्क वाढविण्यात येत आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी आधीच वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा असताना आता शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदारही भाजपसोबत जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर किंवा संभाव्य राजकीय समीकरणांवर चर्चा झाली का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आजच्या घडामोडींवर राज्याचे लक्ष
मंगळवारी रात्री झालेल्या या गुप्त बैठकीनंतर आता सर्वांचे लक्ष बुधवारच्या राजकीय घडामोडींवर लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून कोणती भूमिका मांडली जाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीतील इतर नेते यावर काय प्रतिक्रिया देतात आणि या बैठकीमागील खरे कारण समोर येते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सध्या तरी या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी वर्षा बंगल्यावर झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

