(नवी दिल्ली/तेहरान)
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव अत्यंत तीव्र झाला आहे. गेल्या 39 दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात अत्यंत कठोर आणि वादग्रस्त विधान केल्याने परिस्थिती आणखीच चिघळली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “आज रात्री एका संपूर्ण संस्कृतीचा अंत होऊ शकतो” अशी थेट धमकी दिली. याआधीही त्यांनी अमेरिकन सैन्य इराणला एका रात्रीत नकाशावरून पुसून टाकू शकते, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर Ministry of External Affairs (MEA) ने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी तातडीची सल्लागार सूचना जारी केली आहे.
भारतीय नागरिकांसाठी तातडीचा अलर्ट
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार, इराणमध्ये सध्या असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी पुढील 48 तास जिथे आहेत तिथेच सुरक्षित राहावे. अनावश्यक प्रवास टाळावा आणि शक्यतो निवारा केंद्रांमध्ये (shelters) थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याशिवाय कोणताही प्रवास करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाचा इशारा
भारतीय दूतावासानेही स्वतंत्र अॅडव्हायजरी जारी करत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. लष्करी तळ, वीज प्रकल्प आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांपासून दूर राहावे, तसेच उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांवर जाणे टाळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. हॉटेलमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीही त्यांच्या सध्याच्या ठिकाणीच थांबून अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकही सुरू ठेवण्यात आले आहेत.
हल्ल्यांमुळे मोठं नुकसान
अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः Kharg Island आणि रेल्वे नेटवर्कला लक्ष्य करण्यात आलं आहे. तसेच Qom शहराजवळील भागातही हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांनंतर इराणमधील अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
तणाव वाढण्याच्या सुरुवातीला इराणमध्ये सुमारे 9,000 भारतीय नागरिक होते. त्यापैकी सुमारे 1,800 नागरिक आतापर्यंत भारतात परतले आहेत, तर उर्वरित नागरिक अजूनही तिथेच अडकलेले आहेत. सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती अतिशय संवेदनशील बनली असून कोणत्याही क्षणी ती आणखी बिघडू शकते. त्यामुळे भारतीय नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान Donald Trump यांच्यावर टीका करत इराणने म्हटले की, “एका व्यक्तीच्या धमक्यांनी इराणसारख्या प्राचीन संस्कृतीचा अंत होऊ शकत नाही. तुम्ही आणि तुमची मित्रराष्ट्रे यांनी आमच्या इतिहासाची आणि शक्तीची पूर्ण कल्पना केलेली नाही. इराणच्या संस्कृतीकडून तुम्हाला असे प्रत्युत्तर मिळेल, जे तुम्ही कधीही विसरणार नाहीत.”
इराणने पुढे ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की, Alexander the Great ने इराण जाळले, Genghis Khan च्या मंगोलांनी विध्वंस केला, तरीही इराण टिकून राहिले. ज्याला इतिहास आणि काळ संपवू शकला नाही, त्याला एका व्यक्तीच्या धमकीने काहीही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, तणाव वाढत असताना इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा इशाराही पुन्हा दिला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

