(देवळे / प्रकाश चाळके)
देवरूख व परिसरातील नागरिकांना एच. पी. गॅस सिलेंडर वेळेवर न मिळाल्यामुळे वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर दक्षिण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगराध्यक्षा आणि महायुतीचे नगरसेवक यांनी संबंधित गॅस एजन्सीवर धडक देत थेट जाब विचारला.
गॅस वितरणातील अनावश्यक विलंब, नागरिकांना दिली जाणारी उडवाउडवीची उत्तरे आणि वितरण यंत्रणेतील गैरकारभार यावर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती देत तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, सिलेंडर बुक करून १५ ते २० दिवस उलटूनही घरपोच वितरण होत नाही. तसेच, एजन्सी कार्यालयात कूपनसाठी दोन दिवस उन्हात रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याचे प्रकार घडत आहेत.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी एजन्सी धारकाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, गॅससारख्या अत्यावश्यक सेवेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. नागरिकांना वेळेवर आणि नियमित गॅस पुरवठा करणे ही एजन्सीची जबाबदारी असून, तहसीलदार व पुरवठा विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांनीही या हस्तक्षेपाचे स्वागत करत समस्येवर लवकर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या वेळी भाजप संगमेश्वर तालुका अध्यक्ष रुपेश कदम, शहर अध्यक्ष सुशांत मुळ्ये, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष वैभव कदम, नगरसेविका स्वाती राजवाडे, कविता नार्वेकर, श्रद्धा इंदुलकर, प्राची भुवड, नेहा आंबेकर, रुपेश भागवत, प्रफुल्ल भुवड, आनंद सारदळ आदी उपस्थित होते.

