( मुंबई )
शहरातील चर्चगेट परिसरात घडलेल्या ‘टाटा गार्डन’ हत्याकांडाचा आझाद मैदान पोलीस यांनी अवघ्या 24 तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीची ओळख राहुल पंजवाणी उर्फ ‘पंजाबी’ (वय अंदाजे 55 वर्षे) अशी पटली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता चर्चगेट येथील वीर नरिमन रोडलगत बस डेपोशेजारी असलेल्या ‘टाटा गार्डन’मध्ये राहुल पंजवाणी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
CCTV आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी ताब्यात
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि स्थानिक पातळीवर चौकशी केली. या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी फोर्ट येथील पी. डी’मेलो रोड परिसरात राहणाऱ्या आनंद पांडुरंग जाधव (वय 52) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान आरोपीनेच हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यातील संबंध, तसेच गुन्ह्यामागील पार्श्वभूमी उघड करण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

