(ठाणे / नालासोपारा)
लग्नाचे आश्वासन देऊन २३ वर्षीय तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून नालासोपारा पोलिसांनी २२ वर्षीय जीम प्रशिक्षक आरिफ शेख याला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अन्य तरुणींचेही अश्लील व्हिडिओ आढळल्याचा दावा पीडितेने केला असून, समाजमाध्यमांच्या माध्यमातून ओळख वाढवून ७० ते ८० तरुणींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप दुजोरा मिळालेला नसून, पोलिसांकडून त्यांची पडताळणी सुरू आहे.
पीडित तरुणीची मागील वर्षी आरिफ शेख याच्याशी ओळख झाली होती. जीम प्रशिक्षक असलेला आरिफ समाजमाध्यमांवरही सक्रिय आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, लग्नाचे प्रलोभन दाखवून आरोपीने तिला स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. त्यानंतर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तिने केला आहे. आरोपी आणि त्याची आई रुक्साना यांनी धर्मांतरासाठी दबाव टाकत मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच आरिफच्या मावस भावाने साहिल शेख यानेही आपल्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
आरोपीच्या मोबाईलमधील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर अन्य तरुणींचेही आक्षेपार्ह व्हिडिओ त्यात असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा पीडितेने केला. त्यानंतर तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मदत घेत सोमवारी रात्री नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. समाजमाध्यमांवरून तरुणींशी मैत्री करून त्यांना जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून संकेतस्थळांवर विकणे, असे प्रकार होत असल्याचा आरोप तिने केला आहे. या पद्धतीने ७० ते ८० तरुणींची फसवणूक झाल्याचा दावाही तिने केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेचे स्थानिक नेते संजीव मेहरा यांनी केली आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरिफ शेख, त्याची आई रुक्साना आणि मावस भाऊ साहिल शेख यांच्याविरोधात बलात्कार, बळजबरीने डांबून ठेवणे आणि मारहाण आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. मोबाईलमध्ये आढळलेल्या व्हिडिओंचे स्वरूप, त्यांचा कथित वापर आणि अन्य तरुणींच्या फसवणुकीसंदर्भातील दाव्यांची चौकशी सुरू आहे.
नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एका पीडितेने तक्रार दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मोबाईलमध्ये काही तरुणींचे अश्लील व्हिडिओ आढळले असून, त्यासंदर्भात तपास सुरू आहे. तक्रारदार तरुणीने केलेल्या आरोपांची सत्यता पडताळली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नवरात्रोत्सवादरम्यान हिंदू मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून आरिफ शेख याच्याविरोधात रविवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. जीममध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात कंडोमची सर्वाधिक विक्री होते आणि आपण ३० ते ४० मुलींना जाळ्यात ओढतो, अशा आशयाचे वक्तव्य आरोपीने केल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपीच्या मित्राने या कथित वक्तव्याचा व्हिडिओ चित्रित केल्याचे सांगितले जाते. या व्हिडिओच्या आधारे सकल हिंदू संघटनेचे शिव उपाध्याय यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार धार्मिक भावना दुखावणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवातील कथित वक्तव्य आणि तरुणीच्या लैंगिक शोषणासह अन्य तरुणींचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. तथापि, ७० ते ८० तरुणींची फसवणूक झाल्याचा दावा आणि व्हिडिओंच्या कथित गैरवापरासंबंधीचे आरोप तपासात सिद्ध होतात का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


