(रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी पाचल पूर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी खासदार नारायण राणे यांना दिले आहे.
जनशताब्दी एक्स्प्रेसला विलवडे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, ही येथील जनतेची गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे. कोकणात रत्नागिरीनंतर मोठ्या प्रमाणात चाकरमानी पुढे प्रवास करतात. विलवडे स्थानक परिसराच्या आजूबाजूच्या जवळपास ७० ते ८० गावांतील प्रवासी रोज मुंबई ते विलवडे असा प्रवास करतात. जनशताब्दी ही गाडी रोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन धावते.
ही गाडी विलवडे स्थानकात थांबल्यास लांजा, राजापूर, वैभववाडी आणि शाहूवाडी (कोल्हापूर) अशा चार तालुक्यातील लोकांना याचा फायदा होणार आहे. प्रवाशांच्या सोयीची असणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला विलवडे स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी सुरेश गुडेकर यांनी केली आहे.

