(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील मुख्य रस्त्यावर असलेला सीएनजी पंप सध्या गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि पंप परिसरात वाहनतळाची अपुरी व्यवस्था यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी अक्षरशः धोकादायक ठरत आहे. पेट्रोलियम नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
नियमांना हरताळ; रस्त्यावरच वाहनांची गर्दी
पेसो (PESO) आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमांनुसार, सीएनजी पंपावर वाहनांसाठी स्वतंत्र आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था असणे बंधनकारक आहे. तसेच, मुख्य रस्त्यावर कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, याची जबाबदारी पंप व्यवस्थापनावर असते. मात्र डिंगणीतील या पंपावर परिस्थिती पूर्णतः उलट आहे. गॅस पुरवठा करणारे मोठे टँकर्स आणि इंधनासाठी आलेली वाहने थेट रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे.
धोकादायक वळणांमुळे अपघाताचा धोका वाढला
हा रस्ता आधीच चढ-उतार आणि तीव्र वळणांनी भरलेला आहे. अशा ठिकाणी मोठ्या टँकर्सची रस्त्यावर उभी असलेली रांग चालकांसाठी मोठे संकट ठरत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न लागल्याने अपघाताचा धोका वाढला असून, यापूर्वी किरकोळ अपघात आणि वादावादीच्या घटनाही घडल्या आहेत.
डिंगणी मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून दररोज हजारो नागरिक या रस्त्याचा वापर करतात. पंपाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
जोपर्यंत पंप परिसरात अधिकृत वाहनतळाची योग्य व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत या पंपावर कठोर निर्बंध लादावेत, अशी मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पंप व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासनावरच राहील, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

